नवग्रह मित्र मंडळ

 शंकराचार्य स्थापित गणेशमूर्ती - नवग्रह मित्र मंडळ



प्रत्यक्ष शंकराचार्यांनी स्थापन केलेली एक गणेशमूर्ती पुण्यात आहे आणि ही स्थापनेची घटना पूर्वनियोजित नव्हती, तर अचानक घडून आली. हे भाग्य वाट्याला आलेले गणेश मंडळ म्हणजे कसबा पेठेतील नवग्रह मित्र मंडळ! शनिवारवाड्याच्या उजव्या बाजूस, पहिला मान असलेल्या कसबा गणपतीनजीकच या मंडळाचा गणपती बसतो. या मूर्तीच्या स्थापनेविषयी इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे यांनी माहिती दिली.

१९८७-८८ च्या सुमारास मंडळाने गोसावी या प्रख्यात मूर्तीकारांकडून नवीन मूर्ती घडवून घेतली. फाल्गुन महिन्याच्या अखेरीस मूर्ती तयार होत आली होती. त्यामुळे गुढी पाडव्यास या मूर्तीची प्रतिष्ठापना व गणेशयाग करण्याचे निश्चित झाले. त्या वेळेस कांची कामकोटी पीठाचे ६९वे पीठाधीश श्री जयेंद्र सरस्वती हे पुण्यात होते. तेव्हा बलकवडे व मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सारसबागेजवळील त्यांच्या मठात त्यांची भेट घेऊन येण्याची विनंती केली. शंकराचार्यांनी ही विनंती तत्काळ मान्य केली व ते म्हणाले, 'तुम्ही कुठे यावयाचे हे दाखवण्यासाठी मंडळातील कोणाला तरी पाठवा. मी येतो.' पाडव्याचा दिवस उजाडला आणि जे याग व प्रतिष्ठापना करणारे पुरोहित होते, त्यांनी काही अडचणींमुळे येऊ शकत नसल्याचे कळविले. त्यामुळे मंडळासमोर मोठा प्रश्न निर्माण झाला. मंडळाचे अध्यक्ष मानसिंग पाटोळे व त्या वेळेस सचिव असलेले बलकवडे यांनी ही गोष्ट शंकराचार्यांकडे जाऊन सांगितली, तेव्हा शंकराचार्यांनी तत्काळ स्वतःकडे बोट दाखवले आणि म्हटले, 'हा पुरोहित तुम्हाला चालेल का?' व मठाच्या ११ वैदिकांसह ते कसबा पेठेत आले आणि त्यांनी गणेश याग व मूर्तीची प्रतिष्ठापना रस्त्यावर बसून स्वतः पार पडली. आदी शंकराचार्यांनी द्वारका, पुरी, ज्योतिर्मठ, शृंगेरी येथे चार पीठे स्थापन केली. त्यांनी स्थापन केलेले पाचवे पीठ म्हणजे कांची कामकोटी! तेथे स्वतः आदी शंकराचार्य राहत आणि ते येथील पहिले मठाधीश. या परंपरेतील शंकराचार्यांनी मूर्तीची प्रतिष्ठापना करणे हे महत्‌‌भाग्य नवग्रह मित्र मंडळाच्या वाट्यास आले. तेही पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर. हा मोठा योगच!


पहिल्या दिवशीची मिरवणूक


शेेेवटच्या दिवशीची मिरवणूक

Address - नवग्रह मित्र मंडळ

Comments